| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघातील गद्दार आमदाराला गाडायचे आहे, असा जाहीर आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जत येथील जाहीर सभेतून दिला. काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील चार मतदारसंघात आपणच उमेदवार आहेत असे नियोजन केले आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांचे कौतुक त्यांना जवळ घेऊन केले.
कर्जत विधानसभा मतदारसंघचे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन कर्जत येथे डॉ नानासाहेब धर्मधिकारी प्रवेशद्वार येथील मोकळ्या मैदानात करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी कर्जत मतदारसंघातील विद्यमान आमदार यांच्यावर तोफ डागण्यास सुरुवात केली. गद्दाराला गाडण्यासाठी तुमचे एक मत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात आपले सरकार येत असून, यांना खडी फोडायला पाठवायचे आहे ,असा जाहीर इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
राज्यातील सरकार पाडण्यासाठी खोके घेऊन तिकडे गेल्यावर अडीच वर्षात महाराष्ट्र लुबाडण्याचा काम केले आहे. इथे जसे आपल्याला गद्दाराला पडायचे आहे, तसे महाडमध्ये स्नेहल जगताप यादेखील गद्दाराला गाडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. सरकार उलथवून हा गद्दार दारूचा ग्लास हातात घेऊन टेबलावर नाचत होता, त्या सेलिब्रिटी बनवलेल्या आमदाराला कर्जतची निष्ठावंत जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला. अशा गद्दार आमदारांची मस्ती उतरवायची आहे, असेही ते म्हणाले.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वारजवळ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला आमदार आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी अॅड. गोपाळ शेळके, पनवेल मतदारसंघाच्या उमेदवार लीना गरड, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय गवळी आदी उपस्थित होते.