उपसरपंचाविरोधात सीईओंकडे तक्रार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रांजणपाडा गावासाठी रोहित्र लावण्याची बतावणी करून याठिकाणी फक्त धनदांडग्यांसाठी रोहित्र लावण्यात आला आहे, असा आरोप रांजणपाड्यातील काही ग्रामस्थांनी केली आहे. आवास ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनी खेटी बैठक दाखवून आदित्य किलाचंद यांना रोहित्र लावून दिल्याने त्यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रतिक मोहितेसह अनेकांनी लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत उपसरपंच राजेंद्र वाकडे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीत, रांजणपाडा येथील गट नंबर 115/2 ही मिळकत पूर्वी रांजणपाडा गावकऱ्यांची होती. या मिळकतीचे पंच मंडळी राजेंद्र वाकडे व इतरांनी माधूरी वाकडे यांना सुमारे 25 लाख रुपयांना विकली. त्यानंतर वाकडे यांनी ही मिळकत आदित्य सुधीर किलाचंद यांना विकली. दरम्यान, आवासचे विद्यमान उपसरपंच राजेंद्र वाकडे यांनी गावासाठी रोहित्र घेण्याचा दिखावा करीत खोटी बैठक लावली. गावकीच्या नावाखाली किलाचंद यांच्या गट नंबर 115/2 मध्ये ट्रान्सफर्मर व उच्चदाब वाहीनीची केबल टाकली आहे. रांजणपाडा गट नंबर 113(महाराष्ट्र शासन बिनआकारी कुरण) या मिळकतीमधून तसेच प्रतिक मोहिते (सिटी सर्वे नंबर 904) व इतरांच्या खासगी मिळकतीमधून हा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षात बैठकीच्या अर्जावर ऑक्टोबर 2025 मध्ये रांजणपाडा गावकऱ्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात 21 एप्रिल अशी नोंद करून ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे हे रोहित्र रांजणपाडा ग्रामस्थांसाठी बसविले नसून ते किलाचंद या धनदांडग्यांसाठी बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, या रोहित्रसाठी ग्रामपंचायतीकडून नाहकरत दाखला देण्यात आला. मात्र, त्या दाखल्यावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरपंचासह उपसरपंच यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रतिक मोहिते, राजन पाटील, मनीष गुरव, अशोक गुरव, नयन गुरव, मंदार गुरव, संजय वाकडे, समीर वाकडे, गौरव वाकडे, तेजस पाटील, अमित पाटील, महेश गुरव आदी ग्रामस्थांनी केली आहे.
रांजणपाडा येथे घरे वाढली आहेत. ट्रान्सफर्मरची गरज निर्माण झाली होती. हा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे ट्रान्सफर्मर बसविण्यात आला आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच ही प्रक्रीया पार पाडली आहे. जे आरोप केले आहेत, ते खोटे आहेत.
-राजेंद्र वाकडे,
उपसरपंच, आवास







