। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दिघी- पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस व दुचाकी मध्ये अपघात होऊन आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 7) घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा आरुष समीर गुगले, (8) व त्यांचे सासरे शांताराम गुगले, रा. निलगुण, पो. बामणोली, असे होंडा प्लेझर स्कुटी ने माणगाव शहरातील मोर्बा रोडवरील साई सायकल मार्ट माणगाव येथे आले होते. मयत आरुष याचा सायकलचा टायर दुरुस्त करण्याकरिता दिला असल्याने तो आणण्याकरीता दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माणगाव बाजुकडुन मोर्बा बाजूकडे येणाऱ्या बसवरील चालक सूरज पवार, (27) याने अतीवेगाने येऊन रोडच्या साईडला उभे असलेल्या होंडा प्लेझर स्कुटीला धडक दिल्याने अपघात केला. या अपघातात आरुष समीर गुगले याला लहान मोठ्या स्वरुपाच्या दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला. तसेच शांताराम गुगले यांना देखील दुखापत झाली असून, दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. बेलदार करीत आहेत.







