माथेरान घाटात झाड कोसळले

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान जंगलाने व्यापलेल्या प्रदेशात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात माथेरान नेरळ घाट रस्त्यात एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. झाड कोसळत असताना एक दुचाकी त्या भागातून जात होती. मात्र त्या दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून ते वाचले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
माथेरान घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने वॉटर पाईप स्टेशन नजिक भले मोठे जांभूळ जातीचे झाड कोसळले. मागील काही दिवस सतत पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यात विकेंड असल्याने माथेरानच्या घाटात पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होती.

दरम्यान, नेरळहून एक मोटार सायकल तसेच काही गाड्या माथेरानच्या दिशेने जात होत्या. माथेरानच्या दिशेने जाणार्‍या मोटारसायकलवर या झाडाच्या फांद्यांचा काही भाग पडला. परंतु दैव बलवत्तर म्हणून हे दोघेही बचावले अशी माहिती प्रत्यक्षदर्शी असणारे टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी दिली. झाड पडून रस्ता बंद झाल्याने टॅक्सी चालकांनी पुढाकार घेऊन अर्धे झाड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू करून घाट रस्ता पूर्ववत केला.

Exit mobile version