। सोगाव । वार्ताहर ।
रेवस मार्गावर चोंढी पुलाजवळ बुधवारी (दि.31) दुपारी वडाचे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. याची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना समजल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत स्वखर्चाने पडलेले झाड यंत्राच्या व कोयत्याच्या सहाय्याने प्रसंगी हाताने तोडून बाजूला केले.
अलिबाग-रेवस मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक झाडे रस्त्यावर वाकलेल्या स्थितीत आहेत, या मार्गावर कधी कोणत्या ठिकाणी झाड कोसळेल आणि वाहतूक ठप्प होईल याची कोणती शाश्वती राहिली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अशा धोकादायक असणार्या झाडांची पाहणी करून ती काढण्यात यावी, अशी मागणी अनेकांनी यापूर्वी केली होती. यापूर्वी अनेकदा झाडे पडून वाहतूक ठप्प झाली होती, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी धोकादायक असलेल्या झाडांना न काढता त्यावर जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याने सदर विभाग एखादा भयंकर अपघात होण्याची वाट पाहत आहे, या रस्त्यावरून प्रवास करताना आम्हाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, असे या मार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांनी व वाहनचालकांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप व्यक्त करताना सांगितले.