हातकणंगलेत तिहेरी लढत

| कोल्हापूर | वृत्तसंस्था |

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्‍चित झालं आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार आहे. हातकणंगलेत मविआकडून माजी आ. सत्यजित पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. सत्यजित पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे शाहूवाडी पन्हाळाचे माजी आमदार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत येण्यास तयार नसल्याने, अखेर मविआ आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहेत. इथं शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे मैदानात आहेत. त्यात आता ठाकरे गट सत्यजित पाटील यांना उमेदवारी देणार असल्याने, हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि सत्यजित पाटील दोघांना मातोश्रीवर बोलावणार आहेत.

राजू शेट्टी मातोश्रीवर
दरम्यान, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे सुरुवातीपासून आग्रही आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा मागितला होता. राजू शेट्टी हे दोनवेळा मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मविआने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासाठी हा लोकसभा मतदारसंघ सोडला होता. मात्र राजू शेट्टी यांनी बाहेरून पाठिंबा महाविकास आघाडी द्यावा असा प्रस्ताव ठेवला. शिवाय ते महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक नाहीत.
Exit mobile version