वाहन खरेदीसह सोने, घर खरेदीला पसंती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
दसर्याच्या दिवशी म्हणजे साडेतीन मुर्हूतांपैकी एक मुर्हूत हा अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी विविध वस्तूंची खरेदी करण्याकडे नागरिकांचा अधिक कल असतो. आजच्या दिवशी रायगड जिल्ह्यात अंदाजे 100 कोटीहून अधिक उलाढाल झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा विक्री व खरेदीमध्ये दहा टक्के अधिक वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
यावर्षी दसर्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दुकानांसह इलेक्ट्रीक वस्तू, वाहन मालमत्ता खरेदी तसेच एखादा व्यवसाय सुरु करण्यावर नागरिकांनी भर दिल्याचे समोर आले आहे. वेगवेगळ्या दुकानात खरेदीसाठी अलोट गर्दी झाल्याचे दिसून आले. दसर्यानिमित्त यंदा ग्राहकांचा खरेदीचा उत्साह दिसून आला. ग्राहकांनी सर्वाधिक वाहन खरेदीला अधिक पसंती दर्शविली. तसेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीकडेदेखील कल असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील पु. ना. गाडगीळ, वामन हरी पेठ या प्रसिध्द सोन्याच्या दुकानांसह अन्य सराफांच्या दुकानांमध्ये सोने खरेदीवर ग्राहकांनी भर दिला. आपआपल्या परीने ग्राहकांनी सोने खरेदी करून उत्सव साजरा केला.
रायगड जिल्हयामध्ये एका दिवसात सुमारे आठशेहून अधिक दुचाकी खरेदी झाल्या असल्याची माहिती दुचाकी विक्रेत्यांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेने या वर्षी खरेदीमध्ये 15 टक्केने वाढ झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती दसर्यानिमित्त करण्यात आल्या. त्यामध्ये फायनान्स, रोखीत खरेदीवर सवलत अशा अनेक प्रकारच्या सवलतीचा फायदा ग्राहकांनी घेतला. यंदादेखील रोखीबरोबरच फायनान्सवर दुचाकी खरेदी करण्यात आल्या आहेत. तसेच चारचाकी वाहनांच्या खरेदीलाही ग्राहकांनी पसंती दर्शविली. जिल्ह्यातील सूमारे 50 हून अधिक चारचाकी वाहने खरेदी झाल्याची माहिती चारचाकी विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे.
सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 700 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दार 71 हजार 610 रुपये इतका आहे. तसेच चांदीचे दर 94 हजार रुपये किलो इतके आहे. दरवाढ असतानाही ग्राहकांनी दसर्यानिमित्त सोने, चांदी खरेदीसाठी शनिवारी सकाळी व संध्याकाळी दुकानांमध्ये मोठी गर्दी केली होती. तसेच दसर्याच्या आदल्या दिवशी अलिबागमधील नोंदणी कार्यालयात 37 जणांनी जमीन व घरे खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे.
खरेदीवर दृष्टीक्षेप (रुपयांमध्ये)
दुचाकी - 10 कोटी
चारचाकी - 40 कोटी
सोने- चांदी - 20 कोटी
जमीन, घर खरेदी - सुमारे 18 कोटी