। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथील अडीच वर्षाच्या वेदांत विशाल साळुंखे या चिमुकल्या किल्ले रायगड अवघ्या पावणे दोन तासात सर केला. 2900 फुटावरील रायगड किल्ला चढताना कोणत्याही आधाराविना 1435 पायर्या पार केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर एवढ्या कमी वयात रायगड चढणारा तो जिल्ह्यातील पहिला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नेरळ गावातील विशाल साळुंखे यांचा मुलगा वेदांत हा वडिलांसोबत स्थानिक परिसरातील टेकड्या डोंगर चढून जात असतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर वेदांतला घेऊन जाण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी केला. रविवारी दि.7 वेदांत आई-वडील आणि काका-काकी यांच्यासह नेरळ येथून रवाना झाला. सकाळी 11 वाजता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचल्यानंतर वेदांतने पायर्या चढून जाण्याचा निर्धार आपल्या कोवळ्या आवाजात व्यक्त केला. त्यांनतर त्याचा उत्साह पाहून सर्वांनी 11 वाजून दहा मिनिटांनी किल्ले रायगडच्या पायर्या चढण्यास सुरुवात केली. डोंगरातील पायर्यांच्या बाजूने वाहणार्या पाण्यात खेळत तर कधी उंच पायरी असेल तर हात टेकत पायर्या चढणारा वेदांत हा न थकता किल्ले रायगडावर पोहचण्यासाठी असलेल्या 1435 पायर्यांचे दिव्य पार करून केवळ पावणे दोन तासात पोहचला.
2900 फूट उंचीवरील किल्ले रायगडावर पोहचल्यावर वेदांतने बहीण लावण्या आणि अनुष्का या दोघींसह प्रथम होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी त्या परिसरात उपस्थित सर्वांनी वेदांतच्या कामगिरीचे कौतुक केले.
त्यानंतर वेदांतने महादरवाजातून राजदरबारातील मेघडंबरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनधिष्टीत पुतळ्याला नमन केले. अडीच वर्षाचा असून पालकांना उचलून घ्या, असे न सांगणारा 1435 पायर्या चढून गेल्यावर थकला असेल, असे सर्वाना वाटले होते. मात्र पावणे दोन तासांचे अंतर चढून गेल्यावरही तो थकला नव्हता.
दुसरीकडे रायगड किल्ल्यावर दररोज शेकडो पर्यटक पायर्या चढून जातात. त्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच असतात. मात्र अडीच वर्षाच्या मुलाने सर्व पायर्या चढून पोहचणे हे पहिलेच उदाहरण असल्याचे स्थानिक सांगत आहेत. त्यामुळे आता वेदांतचा अन्य किल्ले सर करण्याचा प्रवास सुरु होणार यात शंका नसून त्याने महाराजांचे सर्व किल्ले सर करावेत, अशी सूचना किल्ले रायगडावरील गाईड प्रश्नत गायकवाड यांनी केली आहे.