दोन तासांची शर्थ अन्‌‍‍ मृत्यूवर मात!

जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वी ब्रेन सर्जरी; डॉ. कृष्णमुर्ती कोकणकर आणि संपूर्ण टिमचे यश

| वाघ्रण | प्रतिनिधी |

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हा रुग्णालयात प्रथमच महिलेच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, न्यूरोसर्जरी विभागातील वैद्यकीय पथकाच्या या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. या यशामुळे गंभीर मेंदूविकारांवरील उपचारांसाठी जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवगाव-अलिबाग येथील कविता अभिजीत खिंजी (वय 37) यांचा आठ दिवसांपूर्वी स्कूटीचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोक्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. न्यूरोसर्जन डॉ. कृष्णमूर्ती कोकणकर यांनी वैद्यकीय पथकाच्या मदतीने रुग्णाची तपासणी केली असता, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन रक्ताची गाठ तयार झाल्याचे निदर्शनास आले. या गाठीचा मेंदूवर मोठा दबाव निर्माण झाल्याने रुग्ण बेशुद्ध असल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेता तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. नातेवाईकांना परिस्थितीची संपूर्ण माहिती देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रुग्णाला शस्त्रक्रिया विभागात हलवण्यात आले. अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कृष्णमूर्ती कोकणकर यांनी शस्त्रक्रिया सुरू केली. तब्बल दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत डॉ. सविता नल्लामडगे, डॉ. हिरालाल कांबळे, डॉ. शितल कोकणकर, डॉ. मयुरी कांबळे यांच्यासह वैद्यकीय पथकाने महत्त्वपूर्ण सहकार्य केले. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला पुढील 12 तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली आणि रुग्ण शुद्धीवर आल्या. सध्या त्यांची प्रकृती वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात प्रथमच मेंदूवरील अशा प्रकारची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातील गंभीर मेंदूविकाराच्या रुग्णांसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या यशाबद्दल जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन होत आहे.

Exit mobile version