शालेय विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; सिडबॉलने वृक्षलागवड

| माथेरान | वार्ताहर |

वृक्षलागवडीसाठी येथील शालेय विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवत बोडक्या झालेल्या डोंगरावर सिडबॉलने वृक्षलागवड केली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दरीमधून खाली हे बनवलेले सिडबॉल फेकले, यामुळे पडतील तिथे अंकुर फुटून झाड यायला सुरुवात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खेळही होतो आणि लागवडही होते.



नागरी भागात झाडे कमी झाल्याने पक्षी कमी प्रमाणात फिरकतात. त्यामुळे पक्षांमार्फत विष्ठेने केली जाणारी लागवड बोडके झालेल्या डोंगरावर होत नाही. त्यामुळे संपूर्ण डोंगर हा ओसाड दिसतो. याबाबत यावर प्रा. शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिरचे शिक्षक संघपाल वाठोरे यांनी काही वर्षे अभ्यास करून सिडबॉलने वृक्षलागवड यशस्वी होते का याचे परीक्षण केले आणि यामध्ये यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी मागील दोन वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांमार्फत सिडबॉल प्रयोग राबविला. दरम्यान, ही लागवड जरी पावसाळ्यामध्ये केली असली, तरी हे बनविण्याचे काम फेब्रुवारी, मार्चपासून सुरू झाले आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सहा महिन्यांची मेहनत यासाठी लागली आहे.

बीज संकलनाद्वारे सिडबँकची उभारणी
फेब्रुवारी-मार्च महिन्यात विद्यार्थ्यांना बीज संकलन करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. त्यासाठी शाळेत ‌‘सीडबँक' स्थापन करण्यात आली. दररोज विद्यार्थ्यांनी बँकेत वेगवेगळ्या फळांच्या बीया जमा करण्यास सुरुवात केली. त्याची नोंद वर्गात घेतली जाऊ लागली. घरात आणलेली फळे, परिसरातील इतर फळे यांच्या बिया फेकून न देता सीडबँकेत जमा करण्याचे आवाहन शाळेमार्फत सतत केले जाऊ लागले. एप्रिल महिन्याअखेरीस शाळेला सुट्टी लागण्यापूर्वी सीडबॉल बनवण्यासाठीच्या साहित्याची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली होती.
सिडबॉल बनविण्याची पद्धत
वारुळाची माती बारीक करून त्याचा चिखल तयार करून त्यात बारीक केलेला पालापाचोळा, शेणखत मिसळवून मातीचे लहान-लहान आकाराचे गोळे तयार करून वेगवेगळ्या फळांच्या बिया टाकून त्यांना गोल व चौकोनी आकार दिले. गोल तयार झाल्यानंतर एका वर्गात सावलीमध्ये त्यांना पूर्ण वाळवले. जून महिन्यात पंधरा तारखेला शाळा सुरू झाली. परंतु, पाऊस पडला नव्हता म्हणून सर्व पाऊस पडण्याची वाट पाहात होते. 24 जूननंतर पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सीडबॉल माथेरानच्या वेगवेगळ्या पॉईंट्सवरून विद्यार्थ्यांच्या मार्फत उतारावर फेकण्यात आले.
सीड बॉल म्हणजे काय?
सीडबॉल किंवा बीजगोल म्हणजे आत बिया असलेला मातीचा गोळा. मातीचे गोलाकार चेंडू बनवणे त्याला सावलीत सुकवून तयार करणे याला सिडबॉल म्हणतात.
पर्यटकांना सिडबॉल भेट
शाळेत भेट देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना, माथेरानला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सीडबॉल भेट दिले. त्यांना त्यांच्या प्रवासात ते कोठेही फेकण्याची विनंती केली. पर्यटकांना ही संकल्पना फार आवडली. अनेकांनी आवर्जून सिडबॉल मागून घेतले.

सिडबॉल काय आणि ते कसे बनवावे हे सर्वांना समजावून सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सिडबॉल बनवून एक छोटी सहल आयोजित करून दगड फेकतो तसे सिडबॉल फेकले. पाऊस पडल्यानंतर बिजामध्ये अंकुर येऊन शेण, पालापाचोळा आणि वारुळाच्या मातीच्या सहाय्याने जमिनीत तग धरून त्याची हळूहळू वाढ होईल. असा हा निसर्गसंपन्न प्रकल्प आहे.

संघपाल वाठोरे, प्रकल्प अधिकारी तथा शिक्षक
Exit mobile version