सुईण लीला आजीचा केला सत्कार
| म्हसळा | वार्ताहर |
दिवाळीच्या पहिल्या दिवशी अनेक मंडळे दिवाळी पहाट या नावाने गाण्याचा कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा करतात, तर काही मंडळे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमां बरोबरच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतात. परंतु, या सर्वांना बगल देत म्हसळा येथील श्रीराम सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा मंडळातर्फे एक आगळावेगळा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मंडळातर्फे श्रीमती लिलाबाई बबन देऊळकर उर्फ लिला मावशी यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन मंडळाचे सदस्य दिलीप पानसरे, मंडळाचे अध्यक्ष सौरव पोतदार, म्हसळा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बाबू शिर्के, म्हसळा नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक अनिकेत पानसरे, हिंदू ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार योगेश करडे, मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र करडे, सचिव समेळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे सदस्य गणेश हेगिष्ट्ये, प्रथमेश करडे, शशांक करडे, राजेश करडे, युवराज करडे, उत्कर्ष पानसरे, ओमकार घोसाळकर, हेमंत करडे, सोहम करडे, यतीन करडे, शुभम करडे, राहुल जाधव आणि इतर सदस्य उपस्थित होते.
गेली 50 वर्षे सुईण म्हणून काम करणाऱ्या लिला मावशी म्हणजे म्हसळा शहरातील आजच्या तरुण पिढीला जिच्या हाताचा पहिला स्पर्श झाला त्या अनुभवसंपन्न सूईन बाई. आज त्यांचे वय 90 च्या घरात पोहोचलेले आहे. लीला मावशीने सुमारे 50 वर्षांपूर्वी वैद्यकीय सोयीसुविधांचा पूर्णतः अभाव असणाऱ्या म्हसळा शहरात अनेक लेकीसुनांची सुरक्षितपणे आणि यशस्वी बाळतंपण केली आहेत.