| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यात डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेत दिवाळीनिमित्ताने मुलांनी विविध आकर्षित वस्तू बनवल्या असून नागरिकांनी या वस्तू खरेदी कराव्यात. अशा उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभर दिव्यांग मुलांकरिता शाळेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यातूनच मुलांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार आणि कौशल्यानुसार शिक्षण व व्यावसायिक दृष्ट्या कौशल्य विकसित केले जाते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदर शाळेत व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव मिळवा या उद्देशाने या उपक्रमामार्फत दिवाळी सणाचे अवचित साधून दिव्यांग मुलांकडून विविध वस्तू बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये पणत्या, अगरबत्ती, सुगंध उटणे, प्रेझेंट पॉकेट, कापडी पिशव्या, शुभ पावले, करंडे, रांगोळी इत्यादी. तसेच सदर उपक्रमात शाळेतील व्यवसायिक कौशल्य शिक्षण घेत असलेल्या 18 वर्षांपुढील मुलांकडून शाळेत सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वस्तू बनवण्यात आल्या.
दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तू फक्त शाळेपुरत्या मर्यादित न ठेवता मुलांमध्ये असलेल्या कला व कौशल्य लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने विविध ठिकाणी शाळेचे स्टॉल लावले जातात सदर वस्तूंचे प्रदर्शन दि. 12, 13 ऑक्टोंबर रोजी प्लॉट नं 137 सेक्टर, 1/ड, शबरी हॉटेल जवळ नवीन पनवेल प्रदर्शनास लावण्यात येणार आहे.