रायगड जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम

दिव्यांगाना रोजगाराचे साधन

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील दिव्यांगाना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी 156 ई-शॉप वाहन दिले जाणार आहे. 15 लाभार्थ्यांना ई-शॉप देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचतगट, महिला बचतगटांना रोजगार करता यावा यासाठी ई-शॉप वाहन ही योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दिव्यांग बांधव 71, मागासवर्गीय बचतगट 28, महिला बचतगट 57 लाभार्थ्यांना ई-शॉप वाहने दिली जाणार आहेत.

पर्यावरणस्नेही ई-शॉप वाहन सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किंमतीची आहेत. वाहनातील अंतर्गत भागात व्यवसायाच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे. फिरत्या वाहनावरील दुकानामुळे दिव्यांग बांधव, बचतगटांना रोजगार प्राप्त होणार आहे.

सर्व विभागांचा 5 टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या निधीतून दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना व्यवसाय करता यावा यासाठी ई-शॉप वाहन देण्याचे निश्चित केले. याचबरोबर महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी ई-शॉप वाहन देण्यात येत आहे. ही योजना यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.

डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड
Exit mobile version