राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन

कळंबोलीत हनुमान जयंती मंडपात ईफ्तार पार्टी
| पनवेल । वार्ताहर ।
समाजात धार्माच्या नावाखाली वातावरण गढूळ होत असतानाच कळंबोली येथे रामदास शेवाळे यांच्या तर्फे एकाच छताखाली हनुमान जयंतीचा भंडारा व रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीचे आयोजन कळंबोली वसाहतीमधील स्टील मार्केट मधील हनुमान मंदिरात करण्यात आले. या उपक्रमात लोखंड बाजारातील सय्यद हवालदार व फारुक हाजी यांच्यासारख्या व्यावसियांकासोबत सुमारे 50 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला.

या वेळी भागवत सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडळ 2, व कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर सहभागी झाले होते. शेवाळे यांनी आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून वातावरण दूषित करण्यापेक्षा एकमेकांच्या धर्माचा आदर करून जातीय सलोखा कसा राखावा हा आदर्श रामदास शेवाळे यांनी उभ्या महाराष्ट्राला घालून दिला आहे. या उपक्रमात नवी मुंबई पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त भागवत सोनवणे यांनी कौतुक करंन नवी मुंबई पोलीसातर्फे हनुमान जन्मोत्सव व रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

आज कळंबोलीतील स्टील मार्केट येथील हनुमान मंदिरात दर वर्षीप्रमाणे हनुमान जन्मोत्सव, भंडारा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दोन धर्मात सलोखा निर्माण व्हावा म्हणून ज्या ठिकाणी हनुमानाचा भंडारा होतो त्याच ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे देखील आयोजन केले होते. मुस्लिम बांधवांनी भगवी शाल परीधान करुन, आरतीचे ताट हातात घेऊन आरती केली आणि यातूनच ऐकमेकांच्या धर्माचा आदर कसा करावा हा बोध घ्यावा. त्यामुळे देशवासीयांमध्ये एकात्मतेची भावना जागृत होईल. – रामदास शेवाळे

Exit mobile version