विसर्जनासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ; भाविकांना करावी लागणार कसरत
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना गणेश विसर्जनासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
रेवदंडा, चौल व परिसरातील हजारो भाविक परंपरेने रेवदंडा समुद्रकिनारी गणेशाचे विसर्जन करतात. सुरक्षित आणि प्रशस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समुद्रकिनाऱ्याची आजची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. कंपनीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात साचलेल्या चिखलामुळे समुद्रापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असून, विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
विशेषतः गणेशमूर्ती खांद्यावर घेऊन समुद्रात उतरावे लागणारे भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. चिखलात पाय रुतणे, तोल जाणे, मूर्ती पडण्याचा धोका किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रद्धेच्या उत्सवात अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण होणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब मानली जात आहे.
गेल्या वर्षीही हाच प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने चिखल हटविण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो केवळ तात्पुरता ठरला. परिणामी अनेक भाविकांना रेवदंडा मोठे बंदर येथे जाऊन गणेश व देवींचे विसर्जन करावे लागले. यंदाही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचे चित्र दिसत आहे. गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर यंदाही प्रशासन शेवटच्या क्षणापर्यंत हातावर हात ठेवून बसणार का? असा संतप्त प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत. रेवदंडा ग्रामपंचायत, संबंधित प्रशासन आणि जबाबदार यंत्रणांनी या प्रश्नाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता भाविकांच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक हिताचा विषय म्हणून गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. यंदा तरी चिखलमुक्त, सुरक्षित आणि प्रकाशयुक्त विसर्जन व्यवस्था होणार की पुन्हा भाविकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार? याकडे संपूर्ण रेवदंडा परिसराचे लक्ष लागले आहे.
चिखलाशी झुंज
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भावनेचा उत्सव आहे. अशा वेळी श्रद्धेपेक्षा चिखलाशी झुंज द्यावी लागणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यापेक्षा दुर्घटना होऊच नये, यासाठी आज निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
