एक विजयी लढा : बलाढ्य कॉर्पोरेट विरुद्ध

प्रा.एन. डी. पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात रिलायन्सने महामुंबई एस.ई. झेड साठी पस्तीस हजार एकर जमीन घेण्याचा घाट घातला होता. पंचेचाळीस गावे त्यात बाधित होत होती. या सक्तीच्या भूमी संपादनाविरुद्ध शेतक-यांचा मोठा लढा उभा राहिला. त्या लढ्याची गोष्ट सांगणारे उल्का महाजन लिखित एक विजयी लढा : बलाढ्य कॉर्पोरेट विरुद्ध या पुस्तकाचे बुधवारी दि. 1डिसेंबर शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर येथे प्रकाशित करण्यात आले.
या लढ्याचे नेतृत्व मा. एन. डी. पाटील यांनीच केले होते. रिलायन्स सारख्या बलाढ्य उद्योग समुहाच्या विरोधात उभे ठाकणे ही सोपी गोष्ट नाही. जे देशातले सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत, त्या मुकेश अंबानी यांनी या जमिनीची मागणी केल्यावर महाराष्ट्र सरकार तत्परतेने त्यांना मदत करायला सरसावले होते. 1894 च्या जमीन संपादन कायद्यानुसार कारवाई तातडीने सुरू झाली. तालुका प्रशासन ते राज्य सरकार सारेच अंबानींच्या दिमतीला असताना रायगड जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आपली जमीन वाचवायला लढाऊ बाण्याने उभा ठाकला. त्यांना जिल्ह्यातील व राज्यातील अनेक कार्यकर्ते, पुरोगामी संघटना व राजकीय पक्षांनी साथ दिली. जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या बँनरखाली हा लढा संघटित झाला. त्या लढ्यातील एक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी या लढ्याच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित हे पुस्तक लिहिले. सदर पुस्तक लिहिण्याची सूचना स्वत: एन.डी. पाटील व कॉ. गोविंद पानसरे यांनी केली होती.
जगभर व संपूर्ण भारत देशात भांडवलदार व बड्या कंपन्या विविध मार्गांनी शेतक-यांच्या जमिनी बळकावत असताना व कर लो दुनिया मुठ्ठीमें असे त्यांचे ब्रीदवाक्य असताना रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी निर्धाराने उभे रहातात, संघटित होतात व हे आक्रमण परतून लावतात ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट होती. या लढ्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून मदत व पाठिंबा मिळाला. सदर प्रकल्पाबाबत सरकारने घेतलेली जनमतचाचणी हा त्या लढ्याचा कळस व अंतिम टप्पा ठरला. या चाचणीमुळे अशा लढ्यांसाटी एक अभिनव पायंडा पडला. ती प्रक्रिया कव्हर करण्यासाठी जगभरातील माध्यमे पेणमधे येऊन पोचली. अनेक अर्थांनी हा लढा देशभर गाजला.
एन. डी. पाटील यांची प्रस्तावना या पुस्तकात असून सदर पुस्तक यापुढे अनेक लढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ते आता प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अंथरूणाला खिळलेले असताना त्यांच्या हाती पुस्तक देऊन अनौपचारिकरित्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सरोजताई पाटील,लेखिका उल्का महाजन पेणचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील, सुरेखा दळवी, मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप पाटकर, दिलीप पाटील, काशीनाथ पाटील, कोल्हापुरातून प्रा. टी. एस. पाटील, कॉ नामदेव गावडे, सतीश कांबळे उपस्थित होते. लोकवा़ङमय गृहाचे हे प्रकाशन असून त्याची किंमत 125रु. आहे.

Exit mobile version