अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी

अंतिम फेरीच्या दिशेने विजेचा वेग; पश्चिम रेल्वे,महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने

| मुंबई | क्रीडा प्रतिनिधी |

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने व अमर हिंद मंडळातर्फे कै. उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक ‌‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या खो-खो स्पर्धेचा अक्षरशः जंगी जल्लोष दादरमधील कै. अजितदादा पवार क्रीडा नगरीत रंगला असून प्रत्येक सामना म्हणजे थरार, जिद्द आणि विजेच्या वेगाचा अविस्मरणीय संग्राम ठरत आहे. या स्पर्धेत पुरुष गटात पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, महिला गटात पश्चिम रेल्वे व मुंबई पोलीस यांनी दमदार विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

या सामन्यात पुरुष उपांत्य फेरीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले. मात्र, त्याचा फायदा घेण्यात अपयश आले आणि पश्चिम रेल्वेने 24-17 असा 4.30 मि. राखून 7 गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. विजयी पश्चिम रेल्वेच्या माधव दिपक, राहूल मंडल, आदित्य गणपुले, मजहर जमादार, वृषभ वाघ यांनी निर्णायक कामगिरी करत विजय साकारला. पराभूत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूरज खाके, पियूश घोलम, प्रसाद भाटकर, आदित्य पाटील यांनी जोरदार लढत दिली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बँक ऑफ इंडियाने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. मात्र, महाराष्ट्र पोष्टने 30-23 असा 7 गुणांनी शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयी महाराष्ट्र पोष्टाच्या हर्षद हातणक, आकाश साळवे, शुभम उत्तेकर, धिरज भावे, लक्ष्मण गवस यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत बँक ऑफ इंडियाच्या जर्नादन सावंत, सुजल जायगडे, अर्पित तिवारी, रामचंद्र झोरे, मयुरेश मोरे यांनी दिलेली झुंज अपुरी ठरली.

त्यानंतर महिला साखळी सामन्यात मुंबई पोलिसांनी नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले आणि 22-18 असा 10 सेकंद राखून 4 गुणांनी महावितरणवर विजय मिळवला. विजयी मुंबई पोलिसांच्या पायल पवार, प्रिया भोईर, दिक्षा सोनसुतकर, ऐश्वर्या पेठे यांनी पोलिसी खाक्या दाखवत विजय निश्चित केला. पराभूत महावितरणच्या मनाली काजर, रोशनी जुनघरे, मीना कांबळे, प्रिया पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महिला साखळीतील दुसऱ्या सामन्यात पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले आणि 29-9 असा एक डाव व 20 गुणांनी मुंबई पोलिसांचा धुव्वा उडवला. विजयी पश्चिम रेल्वेच्या संध्या सुरवासे, मोकाशी, अर्चना माझी, मगाई माझी, दिव्या गायकवाड, किशोरी कल्याणी कंक यांनी सामन्यावर संपूर्ण वर्चस्व राखले. पराभूत मुंबई पोलिसांच्या दिक्षा सोनसुरकर, सुर्वणा सुरवसे, पायल पवार , सपना आंबवले यांनी लढत दिली, मात्र विजय दूरच राहिला.

अंतिम महासंग्रामाची उत्सकुता शिगेला
स्पर्धेतील सर्व सामने आता निर्णायक टप्प्यात पोहोचले असून पुरुष अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट यांच्यात विजेतेपदासाठी महासंग्राम रंगणार आहे. पश्चिम रेल्वेने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून अंतिम विजेतेपदासाठी त्यांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. अजितदादा पवार क्रीडा नगरीत आता अंतिम फेरीच्या महासंग्रामाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून खो-खोप्रेमींसाठी हा थरार अविस्मरणीय ठरणार आहे.
Exit mobile version