वॉर्डबॉय बनला ‘डॉक्टर’! चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे तरुणीचा मृत्यू

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

वैद्यकीय पात्रता नसतानाही स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करून उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या हलगर्जीपणामुळे 21वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी वाशी येथे घडली. प्रचिती भिकुराम भुवड (21) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी मानखुर्द येथील संदेश पाष्टे (30), याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत उपचारपद्धतींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संदेश पाष्टे हा अंधेरी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून कार्यरत आहे. मात्र, मानखुर्द व परिसरात तो स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघड झाले आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत नोंदणी नसतानाही तो इंजेक्शन्स देत असल्याची बाब तपासात समोर आली आहे.

प्रचिती भुवड ही वाशी येथे कुटुंबासह राहत होती. तिला हार्मोनल आजार असल्याने उपचारासाठी कुटुंबीयांनी ओळखीच्या माध्यमातून संदेश पाष्टेला घरी बोलावले. 5 फेब्रुवारी रोजी पाष्टेने तिची तपासणी करून एक इंजेक्शन दिले. त्यानंतर काही वेळातच प्रचितीची प्रकृती बिघडली. त्रास वाढत असल्याचे लक्षात येताच, कोणताही तज्ज्ञ सल्ला न घेता पाष्टेने दुसरे इंजेक्शन दिले. मात्र, यानंतर तिची अवस्था अधिक गंभीर झाली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना संशय आला. प्रचितीचे वडील भिकुराम भुवड यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू करून 6 फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक केली. प्रचितीला नेमकी कोणती इंजेक्शन्स देण्यात आली, ती औषधे कायदेशीर होती का, तसेच डोस चुकीचा होता का, याबाबत सखोल तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले की, “आरोपी डॉक्टर नसतानाही उपचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी उपचार घेताना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पात्रता आणि नोंदणी तपासणे आवश्यक आहे.

Exit mobile version