गोदाम भाड्याने देण्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीच्या परिसरात एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारले आहे. बाजार समितीला आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी गोदाम भाड्याने देण्यावर संचालक मंडळाच्या मासिक सभेत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट यांनी दिली. राष्ट्रीय कृषी विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीमध्ये 50 टक्के निधी कृषी उत्पन्न बाजार समितीने खर्चुन एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारले आहे.
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही महिन्यापूर्वी नवीन संचालक मंडळांची निवडणूक होऊन नवीन पदाधिकारी आणि संचालक मंडळाने कामकाज सुरु केले आहे. शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे बहुमत या बाजार समितीवर असून सभापती आणि उपसभापती हे दोघेही शेतकरी कामगार पक्षाचे संचालक आहेत. मावळत्या संचालक मंडळाने तत्कालीन सभापती गजानन पेमारे यांच्या कार्यकाळात बाजार समितीच्या आवारात एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारण्याचा निर्णय घेतला होता. या गोदामासाठी राज्य सरकारच्या सहकार विभागाने 50 टक्के अनुदान दिले होते, तर 50 टक्के अनुदान हे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीने उभे केले होते. नवीन संचालक मंडळाने पदभार घेतल्यानंतर पहिल्या मासिक बैठकीत एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम यांचा व्यापार आणि व्यवसाय यांच्यासाठी वापर करण्यासाठी चर्चा केली होती. आणि त्यानंतर गोदाम भाड्याने देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.
कर्जत तालुक्यातील चार व्यापाऱ्यांनी एक हजार मेट्रिक तन क्षमतेचे गोदाम भाड्याने मिळावे यासाठी निविदा दाखल केल्या आहेत. त्या निविदा आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची विशेष बैठक कर्जत येथे बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आली. त्यात भाडे जास्त ठेवून अल्प अनामत रक्कम घेण्यावर तसेच भाडे अत्यल्प ठेवून जास्त अनामत रक्कम घेण्यावर विशेष चर्चा त्या बैठकीत बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. त्या विशेष सभेला बाजार समितीचे उपसभापती आणि एक महिला सदस्य अनुपस्थित होते. तर संचालक मंडळाचे सदस्य गजानन पेमारे, यशवंत जाधव ,विष्णू कालेकर, शरद लाड, संतोष वैखरे, रमाकांत जाधव, दिनेश जैन, प्रवीण ओसवाल, हर्षद भोपतराव, अर्चना शेळके, रेणुका मिरकुटे, आदिल गायकवाड, मछिंद्र कुलाल, अजित पाटील, केतन झांजे हे संचालक उपस्थित होते.