मिरचोली शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; शेलूमध्ये बैलगाडीमधून मिरवणूक
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये आजचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत करून साजरा झाला. शेलू शाळेतील विद्यार्थ्यांची चक्क बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात आली.

या शैक्षणिक वर्षाची सुरुवातीला पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत करून साजरा करण्याचे शिक्षण विभागाने आदेश दिले होते. त्यानुसार कर्जत तालुक्यातील सर्व 240 जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिला दिवस विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करून साजरा करण्यात आला. शनिवार असल्याने विद्यार्थ्यांची सकाळची शाळा होती आणि त्यासाठी सकाळ पासून विद्यार्थ्यांनी शाळांचे रस्ते गजबजून गेले होते. रेल्वे स्टेशन असलेल्या शेलू गावातील जिल्हा परिषद येणार्या विद्यार्थ्यांना काही पालकांनी बैलगाडीमध्ये बसवून आणले. शाळेनेदेखील फुग्यांनी सजवलेली बैलगाडीमध्ये बसवून गावाची सैर मारून शाळेत आणण्यात आले. मुख्याध्यापक अनंत खैरे आणि अन्य शिक्षक वर्गाने तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी नव विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
रायगड जिल्हा परिषद शाळा मिर्चोली येथे श्रीसाई ट्रस्ट नवी मुंबई यांचे माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु होत असतानाच उपलब्ध करून दिले. कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील समस्या सोडविण्यासाठी श्रीसाई ट्रस्ट गेली सहा ते सात वर्षांपासून काम करत आहे. यावेळी साई ट्रस्टचे गणेश अय्यर, रिध्दि गाला, राधिका घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. तेथे शाळेचे मुख्याध्यापक सुदर्शन बिडवे तसेच शिक्षिका बिडवे आणि दिलीप घुले आदी उपस्थित होते.