क्रीडाप्रेमींचे प्रेम पाहून भावनीक
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात धडक देऊन इतिहास रचणार्या कुस्तीपटू विनेश फोगाटचे शनिवारी (दि.17) मयादेशात आगमन झाले. यावेळी ’भारत की शेरनी’ अशा जयघोषात क्रीडाप्रेमींनी विनेशचे स्वागत केले. हे स्वागत व प्रेम पाहून विनेश भावनिक झालेली दिसली आणि तिला अश्रू अनावर झाले.
50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्या पुर्वी 100 ग्रॅम वजन अधिक झाल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते. याविरोधात विनेशने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. यामध्ये तिने संयुक्त रौप्यपदक देण्यात यावे, अशी विनंती केली होती. तीन वेळा तारीख पुढे ढकलल्यानंतर क्रीडा लवादाने तिची याचिका फेटाळली. यामुळे विनेशचे रौप्यपदकाचे स्वप्न जरी भंगले असले तरी ती देशासाठी चॅम्पियन असल्याचे भारतीयांचे मत आहे. यावेळी बजरंग पुनिया व साक्षी मलिक या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनी तिचे स्वागत केले. यावेळी विनेश साक्षीच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगही विमानतळावर तिच्या स्वागतासाठी उपस्थित होता. विनेशने यावेळी भारतीयांना दाखवलेल्या प्रेमाचे आभार मानले.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक न देण्याचा निर्णय क्रीडा लवादाने घेतल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने शुक्रवारी 3 पानी पत्र लिहून तिचे मन मोकळे केले होते. तिने तिच्या या पत्रात संघर्षाबद्दल लिहिले होते. तिने म्हटले की, ऑलिम्पिक रिंग्स: एका लहान गावातील एक लहान मुलगी म्हणून मला ऑलिम्पिक म्हणजे काय किंवा या रिंग्जचा अर्थ काय आहे हे माहित नव्हते. माझे वडील, एक सामान्य बस ड्रायव्हर होते. आपल्या मुलांनी एकदिवस विमानातून प्रवास करावा आणि मी रस्त्यावर चालताना ते विमान पाहावं, एवढंच काय ते त्यांचे स्वप्न… मी माझ्या वडिलांचे हे एकच स्वप्न सत्यात उतरवू शकले. माझ्या आईच्या आयुष्यातील कष्टांवर एक संपूर्ण कथा लिहिली जाऊ शकते. तिच्या सर्व मुलांनी तिच्यापेक्षा चांगले आयुष्य जगावे, हिच तिची इच्छा… तिच्या इच्छा आणि स्वप्ने माझ्या वडिलांपेक्षा खूप साधी होती.