। रायगड । खास प्रतिनिधी ।
। रायगड । खास प्रतिनिधी ।
शिवेसना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना (उबाठा) नेत्या स्नेहल जगताप यांच्याविरोधात आक्षेपार्ह व्यक्त केले होते. त्या विरोधात आता रायगड जिल्ह्यातील तमाम महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविध समाजमाध्यमांवर देखील आमदार गोगावले यांचा निषेध व्यक्त करण्यात येत असून त्यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी जोर धरत आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर स्नेहल जगताप यांनी शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश करत हातात शिवबंधन बांधले होते. शिंदे गटाने उध्दव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केल्याची भावना शिवसैनिकांची झाली. त्यामुळे ठाकरेंना चांगलीच सहानभुती मिळत आहे. स्नेहल जगताप या मुळात काँग्रेसच्या त्यांच्यामागे आजही काँग्रेस ठामपणे उभी आहे. त्यांचे वडील माणिक जगताप यांनी महाड विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस तळागाळात रुजवली आणि वाढवली होती. त्याचा फायदा स्नेहल जगताप यांनाच होणार आहे. त्यामुळे भरत गोगावले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिल्याने आमदार गोगावले यांच्या पायाखालची वाळू सरकु लागली आहे. स्नेहल यांना जनतेचा चांगलाच पाठींबा मिळत आहे. त्यामुळे आमदार गोगावले चक्रावुन गेले आहेत. त्यातूनच त्यांच्याकडून अशी अशोभनीय भाषा वापरली जात असल्याचा आरोप महिला वर्गातून केला जात आहे.
एका कार्यक्रमात त्यांनी स्नेहल यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केल्याने तमाम महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. सरकार हे लाडक्या बहिण्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या विकासासाठी कटिबध्द आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने सांगतात. मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार, पदाधिकारी हे महिलांवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. त्यामुळे महायुतीचे सरकार हे महिला विरोधी असल्याचे आता जनतेला पक्के कळले आहे. आमदार गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याचा जिल्ह्यातील महिलांकडून तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.