| पाताळगंगा | प्रतिनिधी |
वणवा पेटविण्याच्या मानवी वृत्तीमध्ये वाढ झाली असून, डोंगराच्या समवेत रस्त्यालगत वणवा पेटविल्याने रस्त्यावर आपघाताला निमंत्रण मिळत आहे. दरवर्षी पावसाळा संपताच माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत निर्माण होत असते. हेच गवत गुरांचे अन्न निर्माण होत असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. मात्र, माळरानावर वनवे लागत असल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
या वणव्यामुळे पक्ष्यांचे घरटे, गुरांचा चारा, औषधी वनस्पती, प्राणी तसेच आता जंगलातील तयार झालेला रानमेवा या वणव्यात जळून खाक होत असल्याचे दुर्दैवी चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. सध्या जंगलात रानमेवा तयार होत आहे. परंतु, रणरणत्या उन्हामध्ये हा वणवा लागल्यानंतर येथील परिसर असह्य होऊन जात आहे. वणवा लावण्याच्या प्रवृत्तीला बंधने घालणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, वणव्यामुळे आदिवासींच्या रोजगाराला खीळ बसत आहे.






