इच्छुक पुरुष सदस्यांच्या मनात धडकी..
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका पंचायत समितीचा निवडणुकीनंतर निकाल लागून दहा दिवस लोटले आहेत. मात्र, अद्याप सभापती पदाची निवडणूक कधी होणार? हे सरकारच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केलेले नाही.दुसरीकडे कर्जत पंचायत समिती सभापतीपद ही नागरिकांचा मागास प्रवर्ग, असे राखीव असताना बहुमत असलेली कर्जत परिवर्तन विकास आघाडी महिला सदस्य यांना सभापती करण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्गमधील सर्वसाधारण असताना पुरुष सदस्य यांच्या ऐवजी महिला सदस्यांना देण्याचा घाट आघाडीकडून घातला जात आहे. दरम्यान, हा नवीन पायंडा पडण्याची शक्यता असून पुरुष सदस्यांमध्ये नाराजी पसरली असून सध्यातरी त्यांच्या मनात धडकी भरली असून पुरुषांची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न कर्जत परिवर्तन आघाडीचे नेते करीत असल्याने त्या निर्णयाचे मोठे दुष्परिणाम आघाडीला भविष्य काळात भोगावे लागू शकतात.
कर्जत पंचायत समितीत असलेली 12 सदस्यांमध्ये कर्जत परिवर्तन आघाडीचे 10 आणि महायुतीच दोन सदस्य निवडून आले आहेत. यावेळी पहिली अडीच वर्षे सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव आहे. तालुका पंचायत समितीच्या 12 जागांसाठी झालेली निवडणुकीत तीन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव होत्या, मात्र या प्रवर्गात असलेले एकूण आठ सदस्य हे या गटातील निवडून आलेले सदस्य आहेत.कर्जत पंचायत समितीमध्ये कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे बहुमत असल्याने आघाडीचा उमेदवार सभापती होणार हे देखील नक्की आहे. सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्गमधील खुले असल्याने महिला किंवा पुरुष असे कोणीही या पदावर विराजमान होऊ शकतात. मात्र राजकारणात एक पायंडा कायम असतो त्याप्रमाणे महिला आरक्षण नसेल तर शक्यतो महिला सदस्य यांचा त्या पदासाठी विचार होत नाही. त्यामुळे आघाडीमधील नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये समावेश असलेले विजयी उमेदवार भगवान चंचे, महेश खारीक आणि नितीन धुळे यांच्या नावाचा विचार होईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा कर्जत तालुक्याला आहे. मात्र कर्जत परिवर्तन आघाडीचे गटनेते म्हणून नमिता सुधाकर घारे यांची निवड करण्यात आल्याने कर्जतमध्ये राजकीय परिवर्तन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नमिता घारे या कर्जत परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा सुधाकर घारे यांच्या पत्नी आहेत आणि त्यामुळे त्यांचा विचार भावी सभापती म्हणून झाला असावा आणि त्यांना त्याच दृष्टीने गटनेते केले असावे, असे बोलले जात आहे.
नमिता घारे यांच्याकडे कुणबी जातीचे ओबीसी प्रमाणपत्र असल्याने त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी राखीव असलेल्या सभापती पदावर विराजमान होऊ शकतात. पण राजकारणात पुरुषांसाठी असलेल्या जागेवर महिला सदस्य यांना संधी देऊन पदाधिकारी बनवले जात नाही, असा अलिखित नियम असताना नमिता घारे यांना कर्जत परिवर्तन आघाडीचे गटनेते केल्याने पुरुष सदस्य नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे. कर्जत परिवर्तन आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट असे दोन पक्ष असून या आघाडीचे दहा उमेदवार विजयी झाले आहेत. या दहा सदस्यांमध्ये आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार सदस्य पुरुष असून त्यांच्याकडे राजकारण आणि समाजकारण यांचा अनुभव आहे, असे असताना देखील नमिता घारे यांना गटनेते केल्याने नाराजी आहे. दुसरीकडे आता सभापती पदावर पुरुष सदस्याला बसवण्याऐवजी महिला सदस्या नमिता घारे यांना सभापती केले जाईल, असे सुतोवाच आघाडीमधील कार्यकर्ते करीत आहेत. त्यांचा थेट परिणाम राजकीय पटलावर पडू शकतो आणि नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये दावेदार असलेले पुरुष सदस्य नाराज होऊ शकतात. महिला आरक्षण असेल तर पुरुषांना संधी मिळत नाही आणि त्यामुळे आघाडीने पुरुषांना संधी द्यावी अशी अटकळदेखील कार्यकर्ते आघाडीच्या नेत्यांना घालत आहेत. त्याचवेळी सभापती पदांसाठी दावेदार असलेल्या एका विशिष्ट जातीच्या सदस्यांना सभापती मिळू नये म्हणून महिला सदस्यांना सभापती करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. कर्जत पंचायत समितीमध्ये सभापती पदाच्या निवडणूकीमध्ये कर्जत परिवर्तन आघाडी असे राजकारण झाल्यास त्याचे मोठे दुष्परिणाम आगामी काळात कर्जत परिवर्तन आघाडीकडून तालुक्यात राजकारण करणाऱ्या पक्षांना सहन करावे लागू शकतात. अशी वेगळी प्रथा पडल्यास कर्जत च्या राजकारणात नवीन समीकरणे देखील उदयास येऊ शकतात.







