स्त्रीला माणूस म्हणून पाहणे आवश्यक – प्रतिक कोळी

| रेवदंडा | वार्ताहर |

आपल्या देशात स्त्री-पुरुष समानतेसाठी स्त्रीला माणूस म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्त्रीवादी तथा संत साहित्याचे अभ्यासक प्रतिक कोळी यांनी केले आहे. ओएसिस : बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा-अलिबाग-रायगड आणि स्वराज्यनीती प्रतिष्ठान, रोहा-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड तालुक्यातील मिठेखार येथील दुर्गामाता मंदिरात मंदिर समिती आणि जय माता दी मंडळ, मिठेखार यांच्या सौजन्याने दसर्‍याच्या पूर्वसंध्येला प्रबोधनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, अनादी काळापासून आपल्या देशात स्त्रीला सती किंवा रती यापैकी कोणत्यातरी एकाच चौकटीत बांधून ठेवण्यात आले आहे. ती माणूस आहे, हेच आपण विसरतो. परिणामी, समाजात लिंगभेद कायम राहून समानतेच्या चळवळी व्यापक प्रमाणात यशस्वी होत नसल्याची खंतही कोळी यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात आदिशक्तीचा गजर तथा शिवाजी महाराज यांचे पुण्यस्मरणाने करण्यात आली. त्यानंतर युवा प्रबोधनकार शिवव्याख्याते सूचित जावरे आणि युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कोळी या जोडगोळीने भारुड, पोवाडा, अभंग, शिवचरित्र अशा संत व ऐतिहासक साहित्याची सांगड घालत स्त्री सबलीकरण, राष्ट्रीय कर्तव्य, मतदान, स्वच्छता, युवा वर्ग-वयोवृद्ध यांचे प्रश्‍न आदी विषयांवर उपस्थितांचे प्रबोधन केले. याप्रसंगी सार्थक गायकवाड यांनी ढोलकीवर साथ दिली.

ग्रामस्थ लक्ष्मण पाटील, रूपाली पाटील, प्रमोद पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा रोटकर, प्रास्ताविक यज्ञेश पाटील, तर आभार प्रदर्शन योगेश पाटील यांनी केले.

Exit mobile version