भरधाव कंटेनरने महिलेस चिरडले; तीन विद्यार्थी जखमी

| पुणे | प्रतिनिधी |

पुणे – मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मातोश्री हॉस्पिटल जवळील बस स्टॉपसमोर उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात पाठीमागून भरधाव वेगाने आलेला कंटेनर सर्व्हिस रस्त्यावर घुसला. यावेळी बसस्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कंटेनरने धडक दिल्याने स्कूल बस, एक मोटारगाडी, दोन मोटार सायकली व दोन टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लता रणजीत जाधव ( 40), मावळ असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. संदीप झालटे ( 40) मावळ, सृष्टी भाटेकर (15) मावळ, मैत्रेय भवार (11) मावळ, मृणाल भवार (14) मावळ अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळित झाली होती. अपघातग्रस्त कंटेनर तेथून बाजूला केल्यानंतर ती सुरळीत झाली. दरम्यान, येथील छेदरस्ता अपघाताचा ब्लॅक स्पॉट झाला असून महामार्ग ओलांडताना येथे अनेकदा अपघात झाले आहेत. रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीने येथे सुरक्षा विषयक उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.

Exit mobile version