ए. वाय. पाटील यांचा शाहू महाराजांना पाठिंबा

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी रविवारी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत शाहू महाराज यांना पाठिंबा दर्शवला. देशातील वाढत चाललेली हुकूमशाही रोखण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या नेत्यांवर नाराज असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आज राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील तीन हजार कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे.

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे सहकारी असणारे ए. वाय. पाटील हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वावर नाराज होते. भाजपमधील काही नेत्यांनी देखील ए. वाय. पाटील यांना महायुतीच्या प्रचारासाठी सक्रिय होण्याची विनंती देखील केली होती. मात्र, आज त्यांनी आपली नवी राजकीय भूमिका स्पष्ट नवीन राजवाड्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार यांच्या उपस्थितीत जाहीर केली.

यावेळी बोलताना ए. वाय. पाटील यांनी देशातील संविधान बदलते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संविधान वाचवण्याबरोबरच सुरू असलेली हुकूमशाही रोखण्यासाठी शाहू महाराजांना पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं. राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातून शाहू महाराजांना मोठं मताधिक्य देऊन निवडून आणू अशी ग्वाही देखील पाटील यांनी दिली.

Exit mobile version