| रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वढाव बुद्रुक परिसरात एक दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह स्मशानभूमीच्या जवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक व खळबळ पसरली आहे.
मृत तरुणाचे नाव बुद्धेश कमलाकर नाईक (20) असून तो फणसापूर आदिवासी वाडी, पो. बापळे, ता. अलिबाग येथील रहिवासी आहे. सध्या तो बामणगाव येथील वीटभट्टीवर वास्तव्यास होता. या प्रकरणी मयताचे वडील कमलाकर नाईक (47) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांचा मुलगा दि. 3 फेब्रुवारी 2026 पासून बेपत्ता होता. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस व नातेवाईकांकडून बामणगाव व लगतच्या जंगल परिसरात शोधकार्य सुरू होते.
दरम्यान, शनिवारी (दि. 7) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास मौजे वढाव बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या परिसरात असलेल्या रांजणीच्या झाडाला, कमरेच्या कापडी पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत बुद्धेशचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात, संबंधित तरुणास मानसिक स्वरूपाचा आजार असल्याचे समोर आले असून, त्याच पार्श्वभूमीवर आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.






