| नागोठणे | प्रतिनिधी |
धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागोठणे रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या निडी येथील रेल्वे रुळाजवळ घडली आहे. या तरुणाचे नाव चंद्रभान चंद्रबली (30) असे असून, तो उत्तर प्रदेश राज्यातील फुलपूर जमालपूर येथील रहिवासी आहे. हा तरूण एका धावत्या रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचा मृतदेह येथील गवतात कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असल्याचे बोलले जात आहे. या तरुणाच्या मृत्यूची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.







