कार दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

कोल्हापूर – राजापूर मार्गावरील अणुस्कुरा घाटात चारशे फूट खोल दरीत कार कोसळून तरुण ठार झाला. कौस्तुभ विजय कुरूप (30), रा. लांजा असे मृताचे नाव आहे. ही घटना आज (दि.4) सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ विजय कुरूप हा लांजा येथून 3 जून रोजी कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने येत होता. रात्री त्याच्या आईने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईने लांजा पोलीस ठाण्यात कौस्तुभ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.

अणूस्कुरा घाटातील दाट धुक्यामुळे कौस्तुभला रस्त्याचा अंदाज आला नसावा आणि त्यामुळे त्याची कार थेट 400 फूट खोल दरीत कोसळली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात कौस्तुभ कारमधून बाहेर फेकला गेला. तो दगडांवर आदळत सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळला. रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा.

हा अपघात आज सकाळी उघडकीस आला. काल, 3 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अणूस्कुरा घाटात जयेश फटकारे या तरुणाला रस्त्यावर एका गाडीचे इंजिन पडलेले दिसले होते. त्यावेळी घाटात धुकं असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, आज बुधवारी सकाळी त्याला तेच इंजिन आणि गाडीचे इतर पार्ट पुन्हा दिसले. यानंतर त्याने तात्काळ अणूस्कुरा घाटातील चेकपोस्टवरील पोलीस कॉन्स्टेबल सचिन वीर यांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन अणूस्कुरा घाटात तपास सुरू केला. यावेळी त्यांना रस्त्याच्या सुमारे दीडशे फूट खाली कौस्तुभ विजय कुरूप याचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला, तर गाडीचे पार्ट सुमारे 400 फूट खोलवर विखुरलेले दिसले. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version