| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मांडवा येथून अलिबागकडे जाणाऱ्या दुचाकीची धडक रस्त्याच्या बाजूला असलेल्या फलकाच्या खांबाला लागली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून, एकाला नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून दुसरा गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री चोंढी येथील पुलाजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षित पालवणकर व शिवम गुप्ता असे दोन तरूण त्यांच्या दुचाकीवरून मांडवा ते अलिबाग असा प्रवास करीत होते. अलिबागकडे जात असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चोंढी येथे पुलाजवळ आल्यावर दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या फलकाच्या खांबाला दुचाकीची जोरदार धडक लागली. या धडकेत दोघांना गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचेदेखील प्रचंड नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच मांडवा पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, शिवम गुप्ता याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला अधिक उपचारासाठी नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात रवाना करण्यात आले. परंतु, पालवणकर हा तरुण रुग्णालयात उपचारादम्यान मृत पावला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुचाकी अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू
