। पनवेल । वार्ताहर ।
श्रद्धेचा गैरफायदा घेत साधूपणाचा मुखवटा धारण करणाऱ्या एका भामट्याने कामोठे येथे राहणाऱ्या तरुणाला हिप्नोटाईज करून त्याच्याजवळ असलेली सव्वा लाख रुपये किंमतीची सोन्या-हिऱ्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. एनआरआय सागरी पोलिसांनी साधूच्या वेशात आलेल्या भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे येथील तक्रारदार उदय केंद्रे (30) हे सकाळी सीवूड्स, सेक्टर-40 मधील पोतदार शाळेजवळ कामानिमित्त आले होते. यावेळी उदय त्याच्या कारमधून उतरत असताना एक जटाधारी, काळे कपडे परिधान केलेली व द्राक्षाच्या माळा व भगवी थैली हातात असलेला अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आली. त्यावर भिक्षा मागणाऱ्या या साधूला उदय यांनी 100 रुपयांची नोट दिली. यानंतर या भामट्याने हातचलाखीने त्याच नोटेसह रुद्राक्ष व फूल देत उदय याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने उदय यांच्याकडून त्यांच्या हातातील प्लॅटिनमची अंगठी मागून घेतली व ती परत दिली. व त्याला बोलण्यात गुंतवून ही अंगठी काढून घेतली व तेथून पलायन केले. त्यानंतर ही माहिती त्याने त्याच्या मित्रांना दिल्यानंतर त्यांनी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
कामोठे येथील तरुणास भामट्या साधूने फसविले
