| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील घोडीवली नावंढे रस्त्यावर शुक्रवारी (दि.12) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. या अपघातात दुचाकीने झाडाला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. सध्याची तरूणाई अति घाई करत बेभानपणे वाहने चालवत असल्याने अनेकांचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होत असतात. त्यातील अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागतो. त्यातच शुक्रवारी खालापुर तालुक्यातील घोडीवली नावंढे रस्त्यावरून एक तरूण पोसरी येथे जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याशेजारी असणाऱ्या झाडाला जोरदार धडकला. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. अनिरुद्ध खानविलकर असे या मृत तरूणाचे नाव आहे. तरुणाचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली जात आहे.






