श्रीवर्धनमधील तरुणाने बांधली इंडोनेशियातील मुलीशी लग्नगाठ

| दांडगुरी | वार्ताहर |

काम धंद्या निमीत्त गेलेले तरुण आता तेथेच आपला जोडीदार निवडत आहे. हा ट्रेंड जिल्ह्यात चांगलाच वाढत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील एका तरुणाने इंडोनेशियातील मुलीशी लग्नगाठ बांधली आहे. या विवाहाची तालुक्यात चांगलीच चर्चा होत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावातील मुरलीधर लाया पाटील यांचा मुलगा भारत याने इंडोनेशिया बाली येथील आय पुतूनुरा सांभा तबानन यांची मुलगी सांतानुदेवी हिच्याशी लग्न केले. भरडखोल येथील विठ्ठल मंदिरात विधिवत भारतीय कोळी समाजाच्या पद्धतीने विवाह समारंभ पार पडला. परदेशातील मुलीबरोबरचा विवाह असल्याने या विवाहाला अनूभवायला परिसरातील लोकांची गर्दी लोटली होती.

भारत हा नोकरीच्या निमित्ताने बाहेर होता. उच्च शिक्षण घेऊन त्याने हॉटेल मॅनेजमेंट करून तो नोकरीसाठी परदेशात गेला. दोघेही एकाच ठिकाणी कामाला लागले होते. तिनेही हॉटेल मॅनेजमेंट केले होते. तिथेच सांतानुदेवी बरोबर त्याची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही ही गोष्ट आई वडीलांना सांगितली होती. दोघांचाही हट्ट असल्याने नाईलाजास्तव आईवडिलांनी रितसर परवानगी दिली. पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाहानंतर सांतानुदेवीला या लग्नाविषयी विचारले असता यापुढे मी भारतीय संस्कृती जतन करून इथले रितीरिवाज पुढे घेऊन जाईन असे म्हटले.

भारतने सांगितले की, आम्हा दोघांनाही वाटलं की, आम्ही एकमेकांना आता पुर्ण समजून घेऊ लागलो आहोत. आता लग्न करायला हरकत नाही. तेव्हा आम्ही आमच्या आई वडीलांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर दोघांच्याही आई वडीलांनी माहिती घेऊनच आमच्या विवाहाला रितसर परवानगी दिली. दोन्ही परिवारा कडून समाजाची सहमती घेऊन भरडखोल येथील विठ्ठल मंदिरात विधिवत विवाह समारंभ नुकताच संपन्न झाला.

Exit mobile version