| नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे रेल्वे स्थानकात प्रवासी रेल्वेतून पडून जखमी व मृत्यू होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाचप्रकारे सोमवारी (दि.18) सायंकाळी 8.25 वाजण्याच्या सुमारास रेल्वेतून तोल जावून पडल्याने अथर्व संतोष पोकळे हा तरुण प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या आपघातात अथर्व याच्या तोंडाला मार लागला असून उजव्या पायाचा ढोप्याच्या खालील भाग कापला गेल्याने ऐन उमेदीतील या तरुणाला पाय गमवावा लागला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून अथर्व या अपघातातून वाचल्याचे बोलले जात आहे. जखमी तरुणावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नेरूळ येथे तातडीने नेण्यात आले. तेथे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि. हरेष काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत.
नागोठणे रेल्वे स्थानकात हा अपघात घडला त्यावेळी स्थानकात रेल्वे पोलिस फोर्सचे कुणीही कर्मचारी स्थानकात नव्हते. त्यामुळे याच रेल्वेतून आलेल्या नागोठण्यातील काही तरुण प्रवाशांनी जखमी अथर्व याला स्थानकातील स्ट्रेचरवर ठेवून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. अपघातानंतर सुमारे पाऊण ते एक तासाने आरपीएफचे दोन कर्मचारी नागोठणे स्थानकात आले. प्रस्तुत प्रतिनिधीने याविषयी माहिती घेतली असता नागोठणे स्थानकात असलेले आरपीएफ कर्मचारी दोन महिन्यांपूर्वी कासू स्थानकात नेमण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. दरम्यान नागोठणे हे मध्यवर्ती स्थानक असूनही येथील आरपीएफ कर्मचारी इतरत्र हटविण्याच्या मध्यरेल्वे प्रशासनाच्या या धक्कादायक व खेदजनक कृतीबद्दल प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
कमी उंचीच्या फलाटामुळे घडताहेत अपघात नागोठणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन वर पनवेल बाजूकडून येणार्या व रोहा, रत्नागिरी बाजूकडे जाणार्या प्रवासी रेल्वे गाड्या थांबत असतात. प्रवासी गाड्या असल्याने या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. मात्र नागोठणे रेल्वे स्थानकातील ज्या फलाट क्रमांक दोन वर प्रवासी उतरत असतात त्या फलाटावरील व रेल्वेगाडी फूटरेस्ट यांच्या मधील अंतर सुमारे अर्धा फूट तर उंची सुमारे दोन फूट आहे. त्यामुळे फलाटावर उतरतांना प्रवाशांचा तोल जाऊन प्रवासी रेल्वेखाली जाऊन भीषण अपघात होत असतात. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याची त्वरित दखल घेऊन नागोठणे रेल्वे स्थानकातील फलाटावर क्रमांक दोनवर तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागोठणे रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.