लोकल प्रवास बंद असतानासुद्धा लोकलमधून प्रवास करणाऱ्या तरुणाचा पडून मृत्यू

नेरळ | प्रतिनिधी |                

नेरळ येथील धबधब्यावर पर्यटनासाठी येण्याकरिता घरातून निघालेल्या ठाणे दिवा येथील 21 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला.लोकल प्रवास सामान्य  लोकांना बंद असताना सुद्धा खचाखच भरलेल्या लोकल मधून नेरळला उतरण्यासाठी धडपड करीत असलेला तो तरुण दरवाजातून खाली कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.                                 

ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील बाबुराव अरुण गावंडे हा 21वर्षीय तरुण कोरोना काळात वर्षभर घरातच होता.कोरोनाच्या भीतीने घरात बसून कंटाळलेल्या या तरुणाला त्याच्या पाच मित्रांनी नेरळ येथे वर्षासहलीसाठी येण्याचे निमंत्रण दिले.पाच मित्रांचा आग्रह असल्याने बाबुराव गावंडे हा तरुण आज 8 ऑगस्ट रोजी सकाळी खोपोली लोकलने नेरळ येथे येण्यास निघाला.डोंबिवली स्थानकात 8.22 च्या खोपोली लोकलला गर्दी असल्याने त्याचे पाच मित्र वेगळ्या डब्ब्यात आणि तो वेगळ्या डब्यातून प्रवास करीत होता.शेलू स्थानक गेल्यानंतर नेरळ स्थानक येणार असल्याने बाबुराव गर्दीतून वाट काढत दरवाजा जवळ येण्याचा प्रयत्न करीत होता.सामान्य लोकांना अद्याप लोकल प्रवास करता येत नाही असे असताना देखील लोकल खचाखच भरली होती. दरवाजा जवळ येत असताना बाबुराव गावंडे हा नेरळ स्टेशन येण्याचे आधी एक किलोमीटरवर असलेल्या दामत फाटकात लोकल मधून पडला.त्याचे पाच मित्र नेरळ रेल्वे स्थानकात उतरून बाबुरावला तो बसलेल्या डब्ब्याच्या बाहेर शोधत होते.मात्र तो दिसला नसल्याने त्या मित्रांनी बाबूरावला फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोनची बेल केवळ वाजत होती.शेवटी नेरळ स्थानकात उतरलेल्या त्या पाच तरुणांनी बाबुरावचा शोध संपूर्ण प्लँटफॉर्म वर घेण्याचा प्रयत्न केला.लोकल गेल्यानंतर सर्व प्रवासी स्थानकातून बाहेर पडल्यानंतर दामत फाटकात कोणी लोकल मधून पडला असल्याची खबर त्या पाच जणांना दिल्यानंतर त्यांची धावपळ सुरू झाली.                                     

दामत फाटक येथे त्या आधी नेरळ स्थानकातील रेल्वे पोलीस पोहचले होते.तेथे त्या तरुणांनी तो मृतदेह आपल्या मित्राचा असल्याचे पोलीस एफ महंमद आणि सहायक निरोक्षक चव्हाण यांना सांगितले.कर्जत तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या आणखी एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून लोकल प्रवास बंद असताना देखील लोकलचा सर्रास वापर होत असल्याने स्थानिक सामान्य लोक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version