। पालघर । प्रतिनिधी ।
डहाणू तालुक्यातील अस्वाली धरण क्षेत्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. धरणाच्या धोकादायक भागात पोहत असताना तरुण कड्यावरून खाली पडला आणि नदीच्या प्रवाहात वाहून गेला. सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह अस्वाली गावठणपाडा येथील नदीपात्रात सापडला.
डहाणू तालुक्यातील अस्वाली धरण येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. विशेषतः शनिवार आणि रविवारी, पर्यटकांची गर्दी असते. रविवारी (दि. 25) पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने, पाण्याचा प्रवाह अधिक तीव्र होता. अशातच मार्मिक महेश कोळी (26) हा त्याच्या मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला होता. धरणाच्या धोकादायक भागात पोहत असताना मार्मिक कड्यावरून खाली पडून नदीच्या प्रवाहात वाहून गेला. संध्याकाळी मार्मिक घरी न परतल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी घोलवड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला. दरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास मार्मिकचा मृतदेह अस्वाली गावठणपाडा येथील नदीपात्रात सापडला.