चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तरुणाची हत्या

। मुंबई । प्रतिनिधी ।

चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तरुणाची हत्या झाल्याची घटना दादरमध्ये घडली. अंशू वर्मा असे मृताचे नाव असून, दादर पोलिसांनी बिरेंद्र श्रीबहादूर पालला या प्रकरणी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोखले रोडवरील चहाच्या स्टॉलवर बिरेंद्र, अंशू आणि वसंत हे तिघे काम करत होते. सकाळी साडे नऊ ते रात्री साडे आठपर्यंत ते काम करून झोपण्यासाठी रूमवर जात. शनिवारी तक्रारदाराच्या मित्राने त्यांना अंशू दारू पिऊन पडल्याचा फोटो पाठवला. तो पाहून तक्रारदाराने त्याच्या मित्राला फोन केला आणि अंशूला उठवून घरी पाठवून देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार कामगार नगर येथे आले असता त्याच्या मित्राने त्याना अंशूला उठवून घरी पाठवून दिल्याचे सांगितले. रात्री तक्रारदार हे रूमवर गेले असता तेथे बिरेंद्र होता. त्यानंतर तक्रारदार मित्रांसोबत निघून गेले. काही वेळाने तक्रारदार याना त्याच्या भावाचा फोन आला. अंशू उठत नसल्याचे त्याना सांगण्यात आले. अंशूला केईम रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांना अंशूच्या तोंडावर मारहाणीच्या जखमा दिसल्या. याची माहिती समजताच दादर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी बिरेंद्रला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर पोलिसांनी बिरेंद्रला अटक केली. हत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

Exit mobile version