कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू

| खुलताबाद | वृत्तसंस्था |

सुलीभंजन दत्तधाम मंदीर परिसरात रिल्स काढण्याच्या नादात कार डोंगरच्या दरीत कोसळून भीषण अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात मयत तरूणीसोबत असलेल्या युवकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मयत तरूणी श्‍वेता हिचा भाऊ मनिष सरोसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुरज संजय मुळे याने श्‍वेता हिस छत्रपती संभाजीनगर शहरापासून 40 किमी लांब डोंगरावर नेले. येथे सूरजने श्‍वेताला कार चालविता येत नाही हे माहिती असूनही कार चालविण्यास दिली. यानंतर रिव्हर्स गिअरमध्ये कार मागे जात दरीत कोसळून श्‍वेता गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. श्‍वेताच्या मृत्यूला सूरज हाच कारणीभूत व जबाबदार आहे. या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीसांनी गुन्हा दाखल करून सूरज मुळे यास अटक केली आहे.

Exit mobile version