पितृछत्र हरपलेल्या 1200 विद्यार्थ्यांना आधार, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम

। पाली । वार्ताहर ।

ठाण्याच्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे या संस्थेचे कार्य गेली 46 वर्षे सुधागड तालुका व ठाणे शहरात अविरतपणे सुरू आहे. संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करीत असून, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल कंपनीच्या विद्यमाने तालुक्यातील 1200 पितृछत्र हरपलेल्या गरीब गरजू, होतकरू व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात वह्या, पेण, पेन्सिल, पुस्तकांचे संच अशी अनेक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

दि.1 व 2 ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग.बा. वडेर हायस्कूल व 14 माध्यमिक शाळांमध्ये प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यालयातील मुख्याध्यापकांकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष वसंत लहाने, संघाचे सुधागड तालुका समन्वयक बळीराम निंबाळकर, चिटणीस अविकांत साळुंके, माजी अध्यक्ष विठ्ठल खेरटकर, पत्रकार दत्तात्रेय दळवी, सल्लागार रमेश सागळे, ज्येष्ठ सल्लागार शिवाजी दळवी, ज्येष्ठ सदस्य हरिश्‍चंद्र मालुसरे, भगवान तेलंगे व 14 विद्यालयातील मुख्याध्यापक व प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील 5 वर्षांपासून टाटा कॅपिटल कंपनीच्या सहकार्यामुळे संस्थेचे शैक्षणिक कार्य दुर्गम भागातील व तळागाळातील शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले असून, वरील शैक्षणिक साहित्यबरोबर ई-लर्निंग डिस्प्ले युनिट विथ एज्युकेशन सॉफ्टवेअर, कॉम्पुटर, वाचनालयासाठी कपाट व पुस्तके, विविध खेळाचे साहित्य, परीक्षा फी, बोलक्या भिंती, सर्व शिष्यवृत्ती परीक्षा पुस्तके, मार्गदर्शन व फी, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व शैक्षणिक स्पर्धाचे आयोजन, नोकरी व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा, सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण, परिचारिका प्रशिक्षण, प्रयोगशाळा साहित्य, शाळेंत स्वच्छतागृह बांधकाम, कोरोना महामारीत ऑक्सिमिटर, थर्मामिटर, निसर्ग चक्रीवादळ नुकसान दुरुस्तीसाठी आर्थिक मदत, उर्मि संस्थेच्या माध्यमातून वॉटर फिल्टर, दत्तक पालक योजना 10 वी, 12 वी, पदवीधर व विशेष प्राविण्य विद्यार्थ्यांचा गुणगौरव, इत्यादी अनेक प्रकारचे कार्य सुधागड तालुका व ठाणे शहरात सुरू आहेत.

Exit mobile version