जम्मू-काश्मीरमध्ये आघाडीची बाजी; भाजपाला जोरदार दणका
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काश्मीर म्हणजे साक्षात पृथ्वीवरील नंदनवन. विधानसभा निवडणुकीत या नंदनवनावर इंडिया आघाडीने एक हाती विजय मिळवत बाजी मारली असून, भाजपाचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. कलम 370 हटवल्यानंतर दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच येथे निवडणुका घेण्यात आल्या. केंद्रातील सत्तेच्या जोरावर काश्मिरात सत्ता स्थापन करण्याचे भाजपाचे मनसुबे येथील जनतेने उद्ध्वस्त केले. केंद्र सरकारने घेतला निर्णय येथील जनतेला मान्य नाही, हे निकालातून दिसून आले आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने 52 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, सर्वाधिक जागा जिंकणार्या नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्लांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आहे.
जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम 2019 मध्ये हटवण्यात आले. त्यानंतर जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. मात्र, मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाने रखडलेली विधानसभा निवडणूक घेण्याचे आणि लवकरात लवकर राज्याचा दर्जा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार येथे तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आली.
पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर, दुसर्या टप्प्यात 25 सप्टेंबर आणि तिसर्या टप्प्यात 3 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कश्मीरचा नारा दिला. मात्र हा नारा फेल गेल्याचे आजच्या निकालातून स्पष्ट झाले. 12 पर्यंतच्या आकडेवारीनुसार इंडिया आघाडी 52, भाजप 28 आणि पीडीपी 2 जागांवर आघाडीवर होते. त्यामुळे कल स्पष्ट झालं असून, ओमर अब्दुल्ला पुन्हा मुख्यमंत्री होणार यावर आता फारुख अब्दुल्ला यांनी शिक्कामोर्तब केले आहे. गेल्यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीचा सुपडासाफ झाला. तर, भाजपला चार जागांचा फायदा झाला आहे. पण, भाजपने जिंकलेल्या सगळ्या जागा या जम्मूमधल्या आहेत. काश्मीर खोर्यात भाजपला खातेही खोलता आले नाही. विशेष म्हणजे, भाजपचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे.
कुणाला किती जागा?
काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स - 52
भाजप - 28
पीडीपी - 02
इतर - 8
आपच्या झाडूने भाजपाची सफाई
आपने एक जागा जिंकत विधानसभेत खाते उघडले आहे. दरम्यान, डोडा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक चार हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार गजयसिंह राणा यांचा पराभव केला आहे. डोडा मतदारसंघात काँग्रेसने शेख रियाझ अहमद यांना, तर नॅशनल कॉन्फरन्सने खलिब नजीब सुहरवर्दी यांना उमेदवारी दिली होती. परंतु, येथे भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये काटाजोड आणि चुरशीची लढत झाली. आणि यात आप उमेदवाराने बाजी मारली. मेहराज मलिक हे प्रदीर्घ काळापासून आम आदमी पक्षाशी संबंधित आहेत. ते डोडा परिसरातील लोकप्रिय नेते मानले जातात.