पुण्याच्या आकाशची ‘सुवर्ण’ कमाई

| पुणे | प्रतिनिधी |

कझाकस्तानमध्ये अस्ताना येथे झालेल्या 22 वर्षांखालील युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाश गोरखाने सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत 22 वर्षांखालील गटात निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या भारताने या गटातील 21 पदकांबरोबरच एकूण 43 पदकांची कमाई केली. यातील एक पदक पुण्याच्या आकाश गोरखाचे होते. त्याने 60 किलो गटाच्या अंतिम फेरीत कझाकस्तानच्या रस्लन कुझेउबाएवचा गुणांच्या विभागणीत 4-1 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.

आकाश गोरखाने सातत्याने मेहनत घेत स्वतःला आशियाई सुवर्णपदकापर्यंत आणले. आकाश गोरखाने वयाच्या 16व्या वर्षी प्रशिक्षक उमेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरावास सुरवात केली. गेल्या वर्षी गोवा येथील राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळविताना अंतिम लढतीत भारताच्या ऑलिंपियन आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या मनीष कौशिकला झुंजविले होते. त्यानंतर आंतरसेनादल राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. सेनादलाचेच प्रतिनिधित्व करताना आकाश गोरखाने मेघालयात झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले तर आता त्याने आशियाई जेतेपद पटकावले आहे. लष्करी क्रीडा संस्थेत सराव करताना जयसिंग पाटील यांनी आकाश गोरखाला अधिक घडवले. या संस्थेतील मुष्टीयुद्धचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल अनुपम कुमार आणि संस्थेचे कमांडंट कर्नल देवराज गिल यांचेही त्याला प्रोत्साहन मिळाले.

Exit mobile version