विविध स्पर्धांमध्ये महिलांनी दाखवले कलागुण; विजेत्यांचा गौरव
| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष अलिबाग शहर महिला आघाडीच्या वतीने बुधवारी (दि.14) आयोजित महाभोंडला कार्यक्रमातील विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषा, उखाणे, प्रश्नमंजुषा, फुगडी आणि इतर मनोरंजक स्पर्धांमध्ये महिलांनी आपले कलागुण सादर केले. या स्पर्धांमध्ये आरती पाटील, भाग्यश्री प्रभू आणि कांचन आरसले यांनी प्रथम क्रमांक पटकावत लक्ष वेधले.
पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत आरती पाटील यांनी प्रथम, विद्या पाटील यांनी द्वितीय, तर कांचन असावा यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उखाणा स्पर्धेत भाग्यश्री प्रभू प्रथम, विनया देसाई द्वितीय, तर प्रमिला जोशी तृतीय ठरल्या. प्रश्नमंजुषा स्पर्धेत कांचन आरसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. फुगडी स्पर्धेत पल्लवी ननवरे आणि निवेदिता वाघमारे यांनी बक्षीस मिळवले. तळ्यात-मळ्यात स्पर्धेत भारती पेरेकर यांनी प्रथम, तर वैजयंती धरणकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. बेस्ट परफॉर्मन्समध्ये माया पटेल प्रथम, सुप्रिया पाटील द्वितीय, तर श्रेया पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
लकी ड्रॉमध्ये अमृता पाटील प्रथम, नीलिमा वाणी द्वितीय, दीपली पाटील तृतीय, प्रियांका कुळेकर चतुर्थ, तर दीपली वाघमारे पाचव्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. अलिबाग शहर महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. नीलम हजारे आणि सहप्रमुख ॲड. अश्विनी ठोसर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते झाले. अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
