रक्ताचं नाही, तर मनाचं जुळलं नातं; चौकटीपलीकडच्या नात्यातून समाजाला संदेश
| चौल | राकेश लोहार |
ग्रामीण भागात माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं नेहमीच खास असतं. पण, काही नाती ही नेहमीच्या चौकटींपलीकडे जाऊन समाजाला वेगळा संदेश देतात. अशीच एक हृदयस्पर्शी मैत्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ती म्हणजे, आस्था नावाच्या दहा वर्षांच्या मुलीची आणि एका बैलाची.
रायगड जिल्ह्यातील चौलमळा गावातील ही हृदयाला भिडणारी गोष्ट आहे, जी माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याची खोली पुन्हा एकदा अधोरेखित करते. आस्था ही चौलमळा गावातील सुप्रसिद्ध बैल खरेदी-विक्रीचे व्यापारी अशोक पाटील ऊर्फ हेडवाले यांची नात आहे. गेल्या 50 वर्षांपासून अशोक पाटील हे बैलांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. हजारो बैल त्यांच्या हातून खरेदी-विक्री झाले; पण प्रत्येक बैलाशी त्यांनी केवळ व्यवहार नाही, तर जिव्हाळ्याचं नातं जपलं.
तोच जिव्हाळा, तीच आपुलकी आणि तीच संवेदनशीलता आज त्यांच्या नातीच्या रूपाने आस्थामध्ये दिसून येते, असे अशोक पाटील यांनी सांगितले.
लहान वयापासून बैलांच्या सान्निध्यात वाढलेल्या आस्थासाठी बैल म्हणजे केवळ जनावर नाही, तर कुटुंबातील सदस्य आहेत. ती बैलाजवळ बसते, त्याच्याशी प्रेमाने बोलते, त्याला थोपटते, त्याची काळजी घेते. विशेष म्हणजे, तो बैलही आस्थाच्या सहवासात पूर्णपणे शांत, विश्वासाने आणि आपुलकीने वागतो. जणू काही शब्दांशिवायच दोघांमध्ये संवाद होत असतो. आज जिथे माणसा-माणसातील नातीही स्वार्थावर आधारलेली वाटू लागली आहेत, तिथे आस्था आणि बैलाची ही दोस्ती माणुसकी, करुणा आणि संस्कारांची जाणीव करून देते. प्राणीही भावना ओळखतात, प्रेम समजतात आणि विश्वास ठेवतात, हे या नात्यातून स्पष्ट होते. अशोक पाटील यांचा पन्नास वर्षांचा अनुभव आणि प्राण्यांबद्दलचा जिव्हाळा आता तिसऱ्या पिढीत उतरल्याचं चित्र आस्थाच्या रूपाने दिसत आहे. ही गोष्ट केवळ एका मुलीची आणि बैलाची नाही, तर ग्रामीण संस्कृतीतील माणूस-प्राणी नात्याची, परंपरेची आणि संवेदनशीलतेची जिवंत उदाहरण आहे. आज ही भावनिक दोस्ती परिसरातच नव्हे, तर सोशल मीडियावरही लोकांच्या मनाला स्पर्श करत आहे. आस्था आणि तिच्या या मुक्या मित्राची गोष्ट अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.
गेल्या पन्नास वर्षांत हजारो बैल आमच्या हातून गेले; पण प्रत्येक बैल हा आम्ही कधीच फक्त व्यवहार म्हणून पाहिला नाही. तो आमच्या कुटुंबाचाच भाग मानला. आस्थाला बैलांशी असलेलं हे प्रेम पाहिलं की मन भरून येतं. आमच्या संस्कारांची, प्राण्यांबद्दलच्या जिव्हाळ्याची हीच खरी शिदोरी पुढच्या पिढीकडे गेलीय, याचा मला अभिमान वाटतो.
-अशोक पाटील,
आजोबा
आस्था बैलाजवळ अगदी निर्धास्तपणे बसते, त्याच्याशी बोलते, त्याची काळजी घेते हे पाहिलं की कळतं की नातं रक्ताचं नसून मनाचं असतं. प्राणीही भावना ओळखतात, हे तिने लहान वयात शिकून दाखवलं. माझ्या मुलीत माणुसकी, करुणा आणि संस्कार जपले जातायत, याचा मला एक वडील म्हणून खूप आनंद आणि समाधान आहे.
-अमित पाटील,
वडील







