अबकी बार 400 पार अशक्य

उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहनुभूती

। मुंबई । प्रतिनिधी ।

अबकी बार 400 पार अशक्य आहे. उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी लोकांमध्ये सहानुभूती आहे, असे खळबळजनक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसे एनडीएचा मार्गही यंदा फार कळीण असून, बारामतीमध्ये होणारी लढत दुर्दैवी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ बोलत होते.

भाजपचा मार्ग आता सहज सोपा राहिलेला नाही. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, 2014 आणि 2019 सारखा भाजपचा मार्ग आता सहज सोपा राहिलेला नाही. त्यांनी दावा केलाय की, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे अणि शरद पवार गटाचे नेते शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे. ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. भुजबळ असंही म्हणाले की, एनडीएचा मार्गही यंदा फार कठीण आहे.

छगन भुजबळांनी बारामतीतील पवार कुटुंबियांच्या लढतीवरही ही लढत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, माझ्यासाठी हा थोडा भावूक क्षण आहे. जे कुटुंबीय मागची इतकी वर्षे एकत्र लढले, ते आता वेगळे झाले आहेत. आता जे सुरू आहे, ते काही लोकांना अजिबात आवडलेले नाही. चूक कोणाची आहे, ती गोष्ट वेगळी परंतु हे जे आता सुरू आहे, ते नसते झाले तर बरे झाले असते, अशी खंत भुजबळ यांनी बोलून दाखविली. याशिवाय नाशिकबाबतदेखील भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच माझे नाव नाशिकसाठी सुचवले होते. त्याप्रमाणे मी मनाची तयारी केली होती. पण, इतर मतदारसंघात उमेदवारी जाहीर होत असताना नाशिकचा निर्णय मात्र होत नव्हता. त्यामुळे मी अखेर माघार घेतली. कारण, मी उमेदवारीसाठी रडत बसणारा नाही. मी महानगरपालिकेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पहिल्यांचा उमेदवारी मागितली होती. त्यानंतर माझ्यावर कधीही निवडणुकीची उमेदवारी मागण्याची वेळ आली नाही. त्यामुळे या पातळीवर येणे, मला पसंत नव्हते, म्हणून मी माघार घेतली असे भुजबळ म्हणाले.

Exit mobile version