रहदारीला अडथळा, अपघाताचा धोका वाढला
| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा-कोलाड रस्त्यालगत अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेली व भंगार अवस्थेत उभी असलेली बेवारस वाहने रहदारीस मोठा अडथळा ठरत आहेत. या बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे पादचारी, सायकलस्वार तसेच दुचाकी व चारचाकी चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, अपघाताला निमंत्रण मिळत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा रोहा-कोलाड रस्ता हा धाटाव औद्योगिक वसाहतीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे कामगार वर्ग, शाळकरी मुले, सायकलस्वार व इतर वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, रस्त्यालगत वाढती अतिक्रमणे, फळे-भाजी व मच्छी विक्रेत्यांचे ठाण, लहान दुकाने तसेच गॅरेजसमोरील उभी वाहने यामुळे रस्ता अरुंद होत चालला आहे.
रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही वाहने पादचारी व दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यातच सायंकाळी पथदिवे कधी सुरू तर कधी बंद असल्याने ही वाहने नजरेस न पडता अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडून काहींना जीव गमवावा लागला असून, काहीजण कायमचे अपंग झाले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्यालगत उभी असलेली ही वाहने मालकांकडून दुर्लक्षित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण करणारी बेवारस व बेशिस्त वाहने तात्काळ हटवून संबंधित वाहनचालक व मालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून रोहा वाहतूक पोलीस प्रशासनाकडे करण्यात येत आहे.






