हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोकनेत्याला अखेरचा निरोप
। सांगोला । विशेष प्रतिनिधी ।
आबासाहेब अमर रहे, गणपतराव देशमुख अमर रहे, जब तब चाँद, सुरज रहेगा आबा तुम्हारा नाम रहेगा, अशा धीरगंभीर वातावरणात शनिवारी दुपारी हजारो अनुयायांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी जनतेचे आधारस्तंभ असलेल्या शेकाप नेते,माजी मंत्री गणपतराव देशमुख या लोकनेत्याला अखेरचा लालसलाम करण्यात आला. पोलिसांच्यावतीनेही बंदुकीच्या फैरी झाडत आबासाहेबांना अखेरची मानवंदना देण्यात आली. सांगोला सहकारी सूत गिरणी आवारात दुपारी 1 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना भावना आवरणेही कठीण झाले.
गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र,शुक्रवारी प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री 9 च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचं पार्थिव सांगोला तालुक्यात दर्शनासाठी येणार असल्याने नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. इतकंच नाहीतर पंढरपूरवरून येणार्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक उभे होते. सांगोला तालुक्यात आबासाहेबांचं पार्थिव आले असता नागरिकांनी आबासाहेब अमर रहे अशा घोषणा दिल्या. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
साधे,सात्विक व्यक्तिमत्व
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले, सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधीत्व केले हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे
वैशिष्ट होते- उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री