चार महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण करून विक्री

11 जणांना अटक
। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबईतून एका 4 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिला विकल्याच्या आरोपाखाली 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या मुलीला 4 लाख 80 हजार रुपयांत तामिळनाडूस्थित एका सिव्हिल इंजिनियरला विकल्याचा आरोप आहे. तामिळनाडूच्या कोइम्बतूर येथून मुंबई पोलिसांच्या दोन पथकांनी या बाळाची सुटका केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या तपासात सर्वप्रथम इब्राहिम अल्ताफ शेख (32) नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. आणि नंतर त्याच्या चौकशीच्या आधारे सायन, धारावी, मालाड जोगेश्‍वरी, मुंबईतील नागपाडा आणि कल्याण आणि ठाणे येथे छापे टाकले. तिथून आणखी दोन महिला आणि चार पुरुषांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलीसांना सांगितले की, ते बाळ 4.8 लाख रुपयांना तामिळनाडूतील एका व्यक्तीला विकले गेले आहे. तेथे दोन पथके पाठवण्यात आली आणि तीन जिल्ह्यांमध्ये चार दिवस शोध मोहीम राबविण्यात आली.
नंतर मुंबई पोलिसांना कोईम्बतूरमधील सेलवनपट्टी येथून एक महिला आणि चार पुरुषांना अटक करण्यात यश आले, या सर्वांना येथे आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
सेल्वनपट्टी येथे राहणार्‍या आनंद कुमार नागराजन या सिव्हिल इंजिनिअरला हे बाळ विकण्यात आले होते आणि आरोपी इब्राहिम शेख हा बाळाच्या आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. इब्राहिम शेखचा दावा आहे की तो मुलाचा पिता आहे, म्हणून आम्ही डीएनए चाचणी करणार आहोत. 1 डिसेंबर रोजी बाळाची आई काही कामासाठी गेली होती आणि अद्याप तिचा शोध लागलेला नाही. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार बाळाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Exit mobile version