शाळकरी मुलाचे अपहरण; आरोपींना अटक

| जालना | वृत्तसंस्था |

जालना येथील शाळकरी मुलाचे अपहरण करुन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना जालन्यात घडली आहे. मंगळवारी (दि.25) सकाळी शाळेत जाताना 11 वर्षाच्या मुलाचे तीन आरोपींनी अपहरण केले होते. पोलिसांनी आरोपींना पाठलाग करुन पकडले आहे.

जालना शहरात काल शाळेमध्ये जाणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी 7 तासात तीनही आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करुन आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान, शहरातील मोंढा परिसरामध्ये सदर आरोपी या मुलाला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी साने गुरुजी शाखेच्या पथकाने पाठलाग करत आरोपींच्या कारसमोर दुचाकी आडवी लाऊन आरोपींना ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Exit mobile version