केस पेपरसाठी लागणाऱ्या टोकनसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ
| रायगड | प्रमोद जाधव |
आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन अभियानांतर्गत मोबाईलच्या एका क्लीकवर घरबसल्या केस पेपरची नोंदणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, हीच ऑनलाईन सुविधा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. टोकन नंबर मिळविण्यासाठी, तसेच केस पेपर काढण्यासाठीदेखील रांगेत उभे राहावे लागत आहे. प्ले स्टोरमधून आभा ॲप डाऊनलोड करणे, मोबाईल नंबरने रजिस्टर करणे, क्यूआर स्कॅन करणे, टोकन मिळणे, त्यानंतर टोकन नंबर दाखवून रांगेत उभे राहून केस पेपर काढणे, ही लांबलचक प्रक्रिया रुग्णांसाठी त्रासदायक ठरत आहे.
आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट, जे एक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड आहे. हे कार्ड नागरिकांना त्यांचे वैद्यकीय रेकॉर्ड्स, प्रिस्क्रिप्शन आणि चाचणी अहवाल ऑनलाइन सुरक्षितपणे साठवण्यास आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांशी शेअर करण्यास मदत करते. ज्यामुळे आरोग्य सेवा मिळवणे सोपे आणि कार्यक्षम होते. या कार्डाद्वारे लोकांना वेगवेगळ्या आरोग्य सेवा प्रदात्यांमध्ये त्यांच्या आरोग्य माहितीवर सहजपणे प्रवेश मिळवता येतो.
जिल्हा रुग्णालयासह आठ ग्रामीण रुग्णालय व सहा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तातडीने सेवा मिळावी, केस पेपर वेळेवर मिळावे, यासाठी प्रत्येक रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षामध्ये पुरुष, महिला ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग अशा वेगवेगळ्या स्वरुपाच्या खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. या खिडक्यांमार्फत रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. केस पेपरसाठी येणाऱ्या रुग्णांचे नाव, पत्ता, वय, आजार अशी वेगवेगळी माहिती घेऊन संगणकामध्ये नोंद केली जाते. त्यानंतर त्यांना केस पेपर दिले जाते. केस पेपर मिळविण्यासाठी तासन्तास उभे राहण्याची वेळ रुग्णांवर येते. रांगेत उभे राहून केस पेपर काढूनदेखील डॉक्टर जागेवर भेटण्याबाबत कायमच ओरड राहिली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आरोग्य विभागाने ऑनलाईनचा आधार घेतला आहे. आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अभियानांतर्गत उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन अभियानांतर्गत मोबाईलच्या एका क्लीकवर घरबसल्या केस पेपरची नोंदणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी प्ले स्टोरमधून आभा ॲप डाऊनलोड करणे, मोबाईल नंबरने रजिस्टर करणे, क्यू आर स्कॅन करणे, टोकन नंबर मिळविणे, त्यानंतर टोकन नंबर दाखवून केस पेपर रुग्णालयातून घेणे ही प्रक्रिया आहे. मात्र, ही प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. केस पेपर काढण्यासाठी टोकन नंबर घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईलद्वारे क्यू आर कोड स्कॅन करणे गरजचे आहे. यासाठी रुग्णालयातील आभा कक्षामध्ये रांगेत उभे राहण्याची वेळ सर्वसामान्यांवर येत आहे. रांगेत उभे राहण्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, टोकन नंबर मिळविण्यासाठीच रांगेत उभे राहावे लागत आहे. या लांबलचक प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
केस पेपर काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आभा हेल्थ मिशन अंतर्गत ऑनलाईन प्रक्रीया राबविण्यात आली आहे. घरूनच ऑनलाईनद्वारे टोकन नंबर प्राप्त केल्यावर रुग्णालयात केस पेपर काढता येणार आहे. ज्यांना माहिती नाही, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. मात्र, टोकन मिळण्यासाठी विलंब होत असल्यास ही प्रक्रीया अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याबाबत कार्यवाही केली जाईल.
डॉ. निशीकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक






